पैठण तालुक्यात प्रोजेक्ट निरामयातर्फे जागतिक कर्करोग दिन साजरा

Foto
पैठण, (प्रतिनिधी): प्रोजेक्ट निरामया अंतर्गत ४ फेब्रुवारी रोजी पैठण तालुक्यात जागतिक कर्करोग जागरूकता दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.

कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान व वेळेवर उपचार याबाबत समाजात जनजागृती वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात समुदाय सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी, आशा व एएनएम यांसारखे अग्रिम आरोग्य कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. बहुसहभागी दृष्टिकोनातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कर्करोगाविषयी जनजागृतीस मोठे बळ मिळाले.

 यावेळी कार्यक्रमात कर्करोगाची मूलभूत माहिती देण्यात आली. समाजात आढळणारे कर्करोगाचे प्रकार, त्यांची सुरुवातीची लक्षणे, जोखीम घटक तसेच लवकर तपासणीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक कर्करोग दिनासाठी तयार केलेल्या शैक्षणिक सादरीकरणाच्या माध्यमातून तंबाखू सेवन, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि उपचारासाठी उशीर करणे यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित घटक कर्करोगाचा धोका कसा वाढवतात, याची माहिती देण्यात आली. विशेषताः गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग या प्रतिबंधात्मक व लवकर ओळखता येणाऱ्या कर्करोगांवर भर देण्यात आला. 

अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना समुदाय पातळीवर जनजागृती, लक्षणांची प्राथमिक ओळख, रुग्णांचे आरोग्य संस्थांकडे संदर्भन (रेफरल) व पाठपुरावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी प्रोजेक्ट निरामयाचे प्रकल्प प्रमुख शंकर गुर्जर, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. भार्गव देशपांडे व हेल्थ अॅक्सेलरेटर म्हणून कार्यरत सौ. आरती सुर्वे, सुनीता मोरे, अमिषा कृपलानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

त्यांनी कर्करोगाबाबत असलेली भीती व सामाजिक कलंक दूर करण्याचे तसेच वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी संवादात्मक चर्चे द्वारे सहभागी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या उपक्रमामुळे कर्करोग हा लवकर निदान झाल्यास प्रतिबंधात्मक व नियंत्रित करता येणारा आजार आहे, हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. प्रोजेक्ट निरामया अंतर्गत पैठण तालुक्यात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि समुदाय व आरोग्य यंत्रणेमधील समन्वय वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.